माझी सद्गुरू माउली, माझ्या जीवनाची साउली

माझी सद्गुरू माउली, माझ्या जीवनाची साउली

प.पु. श्री सद्गुरूंना विनम्र वंदन करून, मी उमाकांत अनंत सावंत माझे काही अनुभव आपल्या सोबत वाटून घेणार आहे.

माझे थोर भाग्य असावे म्हणूनच बाबांच्या निवासस्थानाच्या शेजारी आमचे कुटुंब वास्तव्यास होते. बाबांचे व माझ्या वडिलांचे चांगले मैत्रीचे संबंध होते, असेच एका रात्री जेवल्यानंतर त्या दोघांमध्ये संभाषण सुरु असता, माझ्या वडिलांनी श्री बाबाना विनंती केली की माझ्या मुलांना आपण आपल्या छात्र - छायेखाली घ्यावे. तर बाबानी त्यांस सुचविले की तुमच्या दोन मुलांना म्हणजे मी व माझी मोठी बहीण याना माझ्याकडे पाठवा, हे दोघांचे संभाषण मी ऐकत होतो आणि त्यानंतर बाबांकडे मी आकर्षित झालो.

त्यानंतर त्यांचे प्रत्येक वाक्य मी लक्ष्यपूर्वक शेजारीच असल्याने ऐकत होतो. आता त्यांच्या मुलांसोबत सामूहिक साधनेला जाऊ लागलो. प्रथम जेव्हा मी साधनेला जाऊन बसल्यानंतर साधना सुरु झाली असता, बाबा माझ्या जवळ येऊन माझ्या मस्तकावर हात ठेवताच, दिव्यत्त्वाची मला प्रचिती मला जाणवली. हि अशी प्रचिती मिळण्यासाठी मी दिक्षेसाठी बाबांकडे विनंती केली, त्यांनी ती मान्य केली आणि पुढे शिष्य म्हणून स्वीकारले.

काही कालावधीनंतर बाबांच्या नवीन घराचे काम सुरु झाले असता. घराच्या सुतारकामाची जबाबदारी माझ्यावर सोपवली. त्यांच्या कृपाशिर्वादाखाली व मार्गदर्शनाने सर्व साहित्य आणले गेले. मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे बाबांना सर्व कलेचे ज्ञान अगदी उत्तम प्रकारे होते. जसे एका घरासाठी लागणारे लाकूड ( दरवाजे + खिडक्या ) योग्य मापात आणि संख्येने आणले होते. त्यामध्ये कोणतीही कमतरता नव्हती. तसेच त्यांना रंगसंगतीचे पूर्ण ज्ञान होते. हे प्रकर्षाने जाणवत होते. बाबांच्या मार्गदर्शनाने व कृपादृष्टीने मी व माझा मित्र पांचाळ ह्याने सर्व काम पूर्ण केले. बाबा रांगोळी सुद्धा उत्तम प्रकारे काढत असे.

ह्यानंतर कामावर असताना मला अपघात झाला. पाय सरकल्या मुले माझ्या हातातली काचेची बाटली निसटून मी त्या काचेवर पडलो, त्यामुळे माझ्या हाताच्या तळव्याला मोठी जखम झाली. मी अगदी रक्तबंबाळ झालो. हातातील रक्तवाहिन्या कापल्या गेल्यामुळे खूप मोठा रक्तस्त्राव झाला. मला माझ्या मित्रांनी रुग्णालयात भरती केले माझी जखम बघून डॉक्टरांना देखील आश्चर्य वाटले; की एवढी मोठी जखम असूनही हा माणूस धीरोदात्तपणे कसे सहन करत आहे. माझे मित्र पण खूप घाबरले होते. मी डॉक्टरांना म्हणालो ' मी घाबरलो तर माझे मित्रदेखील घाबरतील म्हणून मी माझी जखम व वेदना सहन करीत आहे '. मला ऑपरेशन थिएटर मध्ये नेतांना मी मनोमन बाबांचा धावा करत होतो. पुढे माझे ऑपरेशन झाले. हाताला बारा टाके बाहेरून आणि आतून ही काही टाके घालण्यात आले होते. बाबा शिष्यांप्रती नेहमीच कृपेचा छायेचा आधार देत असतात. माझ्या तब्यतीची काळजी तेच पाहत होते. प्रत्यक्ष रुग्णालयात देखील माझ्या तब्यती विषयी जाणून घेण्यासाठी ते आले होते. बाबा प्रत्यक्ष मला पाहण्यास हॉस्पिटलमध्ये आले तेव्हा माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. गुरु माऊलीच्या दर्शनामुळे ह्या प्रसंगातून लवकरच बाहेर आलो. तरी माझ्या हाताला काम करण्याची पूर्ण क्षमता येण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागला ही सगळी त्यांचीच कृपा होती.

असेच एके गुरुवारी माझे वडील दर्शनाला गेले असता त्यांनी माझी बद्दलची काळजी बाबांकडे व्यक्त केली. त्यावर बाबा म्हणाले ' तुम्ही काही काळजी करू नका ', आणि त्याच रात्री माझ्या वडिलांचे दुःखद निधन झाले. माझ्या वडिलांच्या देह्त्यागानंतर आम्ही सर्व कुटुंब खूप एकाएकी झालो होतो. त्यावेळी बाबा आमच्या सर्वांच्या मागे खंबीरपणे उभे राहून बोलले, मी आहे तुमच्या पाठीशी काळजी करू नका.

पुढे बाबांच्या कृपाप्रसादाने त्यांनीच सुचविलेल्या सुशील मुलीशी माझा विवाह पार पडला. पुढचे काही दिवस त्रासाचे जातील असे बाबांनी सुचविले होते. ' परंतु काही घाबरू नकोस , मी तुझ्या पाठीशी निरंतर आहेच'.

माझ्या पत्नीला माझ्या कै. वडिलांचे दर्शन व्हावे अशी मनोमन इच्छा होती त्यानुसार मी तिला म्हणालो, ' आता हे फक्त बाबाच करू शकतात, तू त्यांच्या पुढे ही तुझी इच्छा प्रगट कर '. खरोखरच आश्चर्य तो गुरुवार होता त्याच रात्री माझ्या पत्नीला बाबांचे घर दिसले आणि त्या ठिकाणी बाबा आसनस्थ होऊन माझ्या पत्नीस सांगत होते, ' तुला तुझ्या सासऱ्यांना पहावयाचे होते तर तू त्यांना भेट ' काय आश्चर्य पहा माझे वडील माझ्या पत्नीच्या समोर बसले होते व बाबा तिला सांगत होते, ' तुझ्या सासऱ्यां समोर ह्या क्षणी बसली आहेस त्यांना भेट '. माझ्या पत्नीला कृतार्थ करून बाबांनी माझ्या वडिलांच्या देह्त्यागानंतरचे दर्शन घडविले ही केव्हडी गुरु कृपा म्हणावी !

गुरुमाऊलीच्या कृपाप्रसादाने सर्वच बाबतीत दिवस सुखाचे होते. बाबांच्या छात्रछायेखाली आमचा संसार सुखाचा होता पण काही दिवसानंतर मला असे जाणवू लागले की, मी माझ्या पत्नीला शारीरिक दृष्ट्या सांभाळण्यास असमर्थ आहे. माझ्या पत्नीने ही बाब बाबांच्या कानावर घातली. मला बाबांनी त्यावर एक मंत्र दिला. मंत्राचे पठण रोज करण्यास सांगितले, तसेच डॉक्टरी इलाज देखील सुरु ठेवण्यास सांगितले. त्यानुसार आम्ही दादर येथील डॉक्टर फडके ह्यांचे उपचार सुरु केले. बाबांनी माझ्या पत्नीस सांगितले होते की ' तू काही काळजी करू नकोस. तुला लागोपाठ मुलं होतील '. असा आशीर्वाद दिला.

त्यानंतर पत्नीस काही वाईट शक्तींचा त्रास होऊ लागला. त्यावर बाबांनी असे सुचविले की, तुम्ही तुमच्या ठाण्याच्या घरी राहण्यास जा, त्या प्रमाणे आम्ही ठाण्याला राहण्यास आलो. त्यावेळी नवरात्रीचा उत्सवाला सुरवात झाली होती. बाबांकडे देवीची आरती संपल्यानंतर आम्हा दोघांना बाबांनी जेवायला सांगितले आणि आतमध्ये माईंनासांगितले ' आधी ह्या दोघांना जेवायला वाढ आणि मी नंतर जेवण घेईन '. ह्यावरून आपल्याला लक्षात येते की गुरुमाऊलीचे किती बारी लक्ष असते ते.

पुढे काही दिवसांनी माझ्या पत्नीस गरोदरपणाची चाहूल लागली त्यानुसार ही शुभवार्ता सर्व प्रथम बाबांच्या कानावर घातली. बाबांनी ह्या बाबत डॉक्टरांचा सल्ला घेण्याची सूचना केली. त्यानुसार आम्ही डॉक्टरांकडे गेलो, तपासणी केल्यावर डॉक्टरांना सुद्धा आश्चर्य वाटले की एवढ्या लवकर कसा गन आला. त्या डॉक्टरांना काय माहित, माझ्या गुरुमाऊलींची अद्भुत शक्ती माझी पाठराखण करत आहे ते.

पुढे नऊ मास सारून आम्हांस सुंदर कन्यारत्नाचा लाभ झाला. आम्हा दोघांचा आनंद गगनात मावेनासा झाला सर्व प्रथम ही गोड बातमी माझ्या गुरुमाऊलींच्या कानावर घातली. नंतर पुढील मार्गक्रमण सुरु झाले, आणि काही महिन्यानंतर पत्नीस दुसऱ्या अपत्याची चाहूल लागली आणि ही बातमी बाबांना सांगितली आणि त्यांनी स्मितहास्य दर्शविले. नऊ मास संपत्तीनंतर आम्हास पुत्ररत्नाचा लाभ झाला. बाबांनी सांगितल्या प्रमाणे तुला लागोपाठ मुलं होतील ह्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्हा उभयतांस आला.

श्री. सद्गुरूंची लीला पहा, माझ्या दोन्ही मुलांचा जन्म लागोपाठ वर्षात आणि एकाच महिन्यात आणि एकाच तारखेला झाला आहे. फक्त माझ्या मुलाचा माझ्या मुली पेक्षा दीड तास अगोदर जन्म झाला.

बाबा खरंच तुम्ही माझ्या आयुष्यात घडवून आणलेला हा चमत्कार आहे. मी मझय संपूर्ण आयुष्य आपल्या चरणी वाहिले तरी ते कमीच आहे.

बाबा तुम्ही आम्हांला तुमच्या चरणकमळी ठेवलेत हेच आमचे परम भाग्य. असेच शेवट पर्यंत आपल्या चरणकमळी ठेवा म्हणजे मी खऱ्या अर्थाने कृतार्थ होईन !